शहरात २० दिवसांत ५८५ आगीच्या घटना   

पुणे : शहर व परिसरात गेल्या काही वर्षांत मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वरचेवर वाढत आहे. यामुळे आग लागण्याच्या घटना वाढत असून एप्रिल महिन्यात २० तारखेपर्यंत वीस दिवसात तब्बल ५८५ लहान मोठ्या आगीच्या घटना झाल्या आहेत. तर मार्च महिन्यात ७७६ आगीच्या घटना झाल्या आहेत.
 
पर्यावरणाचा र्‍हास आणि वाढत जाणारे सिमेंटचे जंगल यामुळे मागील काही वर्षापासून उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील थंड व पर्यावरण पुरक शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुणे शहराचेही तापमान वाढत आहे. 
 
तापमान वाढल्यानंतर शॉर्टसर्किट आणि गवत, कचर्‍याला आग लागण्याच्या घटना घडत असतात.शहरात आगीच्या घटना घडल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ती विझवली जाते. या वर्षी जानेवारीपासूनच शहरात उन्हाचा चटका सुरू झाला असून, तापमानाचा पारा चढा राहिलेला आहे. मार्चअखेरीस शहरातील तापमान ३८-३९ च्या आसपास राहिल्यानंतर एप्रिल महिन्यात शहराच्या काही भागात तापमान थेट ४३ पर्यंत गेले आहे. यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात ५५५, फेब्रुवारी महिन्यात ६४०, मार्चमध्ये ७७६ तर एप्रिल महिन्यात २० तारखेपर्यंत वीस दिवसात तब्बल ५८५ लहान मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत.

काय सांगते आकडेवारी

वर्ष - जानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल
२०२३ - ५०२ - ५२२ - ४८२ - ५७५
२०२४ - ४२५ - ४७९ - ५६८ - ६३२
२०२५ - ५५५ - ६४० - ७७६ - ५८५ (२० एप्रिलपर्यंत)
 

Related Articles